एफटीआय मध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृतदेह सडलेल्या अवस्थेत, सुसाईड नोटचा पोलिसांकडून शोध

0

पुणे, रयतसाक्षी : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट (एफटीआय) मध्ये शुक्रवारी सकाळी ९ : ०० सुमारास अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्विन अनुराग शुक्ला (वय 32) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा साल्वादोर नॉर्थ गोवा याठिकाणचा रहिवासी होता.

याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षास लॉ कॉलेज रस्त्यावरील एफटीआय महाविद्यालयात मुलांच्या जुन्या हॉस्टेलमध्ये आत्महत्येसारखा प्रकार घडला असल्याचा फोन आला. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यानुसार डेक्कन पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह सडलेला

संबंधित ठिकाणी बी ब्लॉक रुम क्रमांक एस-१२ च्या दरवाजाच्या वरील खिडकीतून पोलीसांनी आत डोकवून पाहिले असता सदर खोलीत राहणाऱ्या आश्विन शुक्ला या विद्यार्थ्याने खिडकीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांनी अग्नीशामक दलाच्या जवनांना घटनास्थळी बोलावून घेत आतून बंद असलेला दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

प्रथमदर्शनी हा प्रकार हा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिसून येत आहे. बाजूलच्या खोलीत राहणाऱ्या मुलांनी अश्विन शुक्ला यास शेवटचे मंगळवारी पाहिल्याचे सांगितले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कोणती सुसाईट नोट लिहिली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेल नाही. त्यामुळे नेमकी त्याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली याचा उलगडा अजूनतरी झालेला नाही. याबाबत अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.