पावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी सावंतांची उत्तर देताना दमछाक

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंतांची दमछाक

0

 

रयतसाक्षी : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होत आज विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले. यावेळी उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंतांची दमछाक झालेली पाहायला मिळाली.

शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून मुंबईत सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधकांनी सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधीपक्ष नेते अजित पवारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावतांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

पालघरचा प्रश्न उपस्थित

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर अजित पवार यांनी पालघरमध्ये आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा वर किती निधी आहे किती निधीचा वापर झाला, याची माहिती द्या, असा प्रश्न केला. त्यावर मात्र, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देणे जमले नाही.

प्रश्न ठेवला राखून

सावंत म्हणाले, पुढील तासाभरात उत्तर देतो. यानंतर प्रश्न राखून ठेवण्यात आला. तासाभरात उत्तर देतो असे म्हटल्यावर विरोधक आक्रमक झाले. यावर माहिती एक तासात मिळेल असे वाटत नाही. जर तसे झालेच तर हा प्रश्न आपण सोमवारी सभागृहात मांडू, असे अध्यक्ष म्हणाले.

तानाजी सावंत आहेत कोण?

पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती तानाजी सावंत यांनी 2017 ला शिवसेनेत प्रवेश होता. जेव्हा पक्षाने त्यांना यवतमाळमधून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. तानाजी सावंत हे 2014 सालच्या सेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले. यानंतर 2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद येथील परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले.

शिक्षण, कारखानदारीसह सावंतांनी राजकारणात देखील आपली छाप सोडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत बंड करत तानाजी सावंत उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.