पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत

आरोग्य विभागाच्या सहसंचालकास अटक, बोटले याने पेनड्राइव्हमधून बडगिरेला पेपर दिले

0

मुंबई, रयतसाक्षी: आरोग्य विभागाच्या ‘ड’ वर्गाच्या भरती परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करत असलेल्या पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना थेट मुंबईतील आरोग्य विभागापर्यंत धागेदोरे मिळाले आहेत. पोलिसांनी आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागातील सहसंचालक व पेपर निश्चित करणाऱ्या समितीतील वरिष्ठ अधिकारी महेश सत्यवान बोटले (५३, मुलुंड वेस्ट, मुंबई) याला अटक केली आहे.

३१ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेच्या पेपरचे प्रश्न व उत्तरे असलेला मॉडेल पेपर त्याने पेन ड्राइव्हमधून लातूरचे आरोग्य विभाग संचालक प्रशांत बडगिरेला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच बोटले याच्या संगणकावर पोलिसांना संबंधित पेपर मिळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. हाके यांनी दिली आहे.

बडगिरेला पेपर देताना तो कुठेही फुटला जाणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले होते. सैनिक, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ६ ते ६.५ लाख रुपये घेऊन त्यातील निम्मी रक्कम बोटलेला मिळणार होती.

त्याने आणखी कुणाला पेपर दिलेले आहेत तसेच या कटात आणखी कोण सहभागी आहेत याबाबतचा तपास सायबर गुन्हे शाखा करत आहे. गुरुवारी बोटलेला पुणे न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणात आजवर १२ आरोपींना अटक झाली असून बोडगिरेला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.