राजधानीतील शेतकरी आंदोलन अखेर संपले!

३७८ दिवस चालेल्या शेतकरी आंदोलनाचा आज समारोप ; केंद्र सरकारच्या प्रस्तावा नंतर किसान सभेच्या निर्णय

0

रयतसाक्षी: गेल्या वर्षभराहून अधिक काळ केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करत होते. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी आंदोलन संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आम्ही मोठ्या विजयासह घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील.

यानंतर १३ डिसेंबर रोजी सर्व शेतकरी संघटनांचे नेते श्री दरबार साहिब, अमृतसरला भेट देतील. यासोबतच पंजाबमधील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या पदयात्राही १५ डिसेंबरपासून संपणार आहे. दरम्यान, १५ जानेवारीला पुन्हा शेतकरी नेत्यांची आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांनी दिली.

महत्वाचं म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार तिन्ही कृषी कायदे माघारी घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. कायदे माघारी घेण्याच्या घोषणेनंतर जवळपास २० दिवसांनी आंदोलन संपवत असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलनकर्त्यांनी उभारेलेले तंबू सोडण्यास सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.