आठवणींतले प्रबोधनकार’ पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

0

मुंबई, रयतसाक्षी: थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा येथील मुंबई मराठी पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.देसाई बोलत होते.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहणे आणि ते वाचणे हे धाडसाचे काम असल्याचे सांगून मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली, त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. प्रबोधनकारांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती होतेय ही आनंदाची बाब आहे. ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी यावेळी केले.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाच्या अंकात प्रकाशित झालेल्या जवळजवळ १ हजार ५०० लेखांचा संग्रह तयार करून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

पुस्तकाचे प्रकाशक भास्कर जाधव म्हणाले, हे पुस्तक तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि विचारांच्या पलीकडे जावून कार्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या चळवळीला पुढे नेण्यासाठी तरूणांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे श्री.जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, ‘मार्मिक’ चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार मंदार म्हात्रे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.