कोरोना प्रतिबंधक लस घेवून आपल्‍या कुटूंबाला सुरक्षित ठेवा मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

कंधार येथे आढावा बैठक; 16 डिसेंबर पर्यंत लसीकरण पूर्ण करण्‍याच्‍या सूचना

0

नांदेड, रयतसाक्षी: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. कोरोनाच्‍या दुस-या लाटेनंतर ओमायक्रॉन या नव्‍या व्‍हेरिएंटचे संकट निर्माण झाल्यामुळे कोविड लसीकरणासाठी मोठया प्रमाणात जिल्हा परिषदेने लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमे अंतर्गत बुधवार (दि.८) डिसेंबर रोजी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी कंधार तालुक्याचा दौरा केला. पंचायत समिती कार्यालयात त्‍यांनी सर्व यंत्रणेची बैठक घेवून लसीकरण मोहिमे संदर्भात आढावा घेतला.

त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी उप विभागीय अधिकारी शरद मंडलीक, तहसिलदार एस.एस. कामठेकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्‍हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, गट विकास अधिकारी सुधेश मांजरमकर, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. एस.पी. ढवळे, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी व्हि.बी. चव्‍हाण, गट शिक्षणाधिकारी संजय येरमे आदींची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, जिल्‍हयात लसीकरणासाठी त्रिसुत्रीचा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये सर्व शासकिय व निमशासकिय यंत्रणा, स्‍थानिक संस्‍था, बचत गट, अधिकारी व कर्मचारी यांनी लसीकरण न झालेल्‍या व्‍यक्‍तींचे जनागृतीसाठी पुढाकार घेवून दररोज होणा-या लसीकरणाची माहिती संकलीत करणे,

दुस-या स्‍तरावर हर घर दस्‍तक अभियानांतर्गत आशाताई व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी लसीचा पहिला डोस झाला नाही अशा नागरिकांच्‍या याद्या तयार कराव्‍यात तर तिस-या स्‍तरावर ज्‍यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे ,त्‍यांना दुसरा डोस देण्‍यासाठी जनजागृती करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. कामानिमित्‍त गावातून स्‍थलांतरीत झालेल्‍या नागरिकांनी लस घेतली आहे किंवा नाही याची खात्री त्‍यांच्‍या नातेवाईकांव्‍दारे तसेच फोनवर संपर्क करुन करावी.

तसेच कोवीड लस घेतली असल्‍याचे प्रमाणापत्र संकलीत करावे. या मोहिमे दरम्‍यान कंधार तालुक्‍यातील पानशेवडी ग्रामपंचायतीने 88 टक्‍के लसीकरण केल्‍याबद्दल मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी कर्मचा-यांचे कौतुक केले. हळदा ग्रामपंचायतीमध्‍ये ७ हजार ७१५ चे लसीकरण उदिष्‍ट आहे. त्‍यापैकी तीन हजार ३३९ जाणांनी लस घेतली आहे. उर्वरीत लसीकरण पूर्ण करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या.

यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी लसीकरण मोहिमेसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुका आरोग्‍य अधिकारी यांनी लसीकरणाच्‍या विशेष मोहिमेत दिनांक (दि.८ व ९) डिसेंबर या दोन दिवसात कंधार तालुक्‍यात तीन हजार ४६६ नागरिकांचे लसीकरण झाल्‍याचे सांगीतले.

पंचायत समिती व तहसिल कार्यालयात कंट्रोल रुम तयार करुन दररोज गावस्‍तरावरचा आढावा घ्‍यावा, जिल्‍हा परिषदेने लसीकरणासाठी राबविण्‍यात येत असलेल्‍या या विशेष मोहिमेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून दि. १६ डिसेंबर पर्यंत शंभर टक्‍के लसीकरण पूर्ण करण्‍याच्‍या सूचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केल्‍या. या बैठकीला तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्‍य सेवक, आरोग्‍य सेविका, आशाताई आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.