लसीकरणासाठी यंत्रणांनी कॅम्पेनमोडचे सुत्र अवलंबवावे -सीईओ

घरो-घरी समूहाने भेटीद्वारे लसीकरणासाठी प्रोत्साहीत करण्याच्या निर्देश झेडपीच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी यंत्रणांना दिल्या

0

नांदेड, रयतसाक्षी: कोविड लसीकरणासाठी गावपातळीवर सर्वांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक या सर्वांनी एकत्रित कॅम्पेन मोडमध्ये काम करावे. लाभार्थ्यांच्या याद्या एकत्रित करून त्यातील जे लस घ्यावयाचे राहिले असतील त्यांच्या घरी समूहाने भेट देऊन त्यांना लसीकरणासाठी तयार करावे.

लोक तयार होतात. त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. लोकांना आवाज द्या, लोक येतात. तळागाळात जाऊन अत्यंत तडफेने हे काम करणे आवश्यक असल्याचे मत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज हदगाव येथे व्यक्त केले.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती महादाबाई तम्मलवाड, उपसभापती शंकर मेंडके, तहसीलदार जीवराज डापकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिर्गसकर, नायब तहसीलदार भगवानराव हंबर्डे, गट विकास अधिकारी केशव गड्डापोड, नगर पालिकेचे मुख्याधिकारी दामोदर जाधव, उप अभियंता अशोक भोजराज, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र बजाज, गट शिक्षणाधिकारी किशन फोले, मधुकर सरोदे, संदीप काळबांडे आदींची उपस्थिती होती.

हदगाव येथील सुमन मंगल कार्यालयात आज शनिवार दिनांक शनिवार (दि.११) डिसेंबर रोजी कोवीड- १९ अंतर्गत विशेष लसीकरण मोहीमे संदर्भात सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी लसीकरण मोहिमेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पळसा, फळी, दगडगाव, बनचिंचोली, डोंगरगाव व चोरंबा बु., साप्ती येथील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचा-यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी गावनिहाय आढावा घेतला. हदगाव तालुक्याने इतर उपक्रमांमध्ये अव्वल बाजी मारलेली असताना लसीकरणामध्ये हा तालुका मागे पडल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गावपातळीवर सर्वांनी एकत्रित काम करून येत्या आठ दिवसात ९०% लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
या कामी दिरंगाई करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. लसीकरणाचे सत्र सकाळी किंवा संध्याकाळी लावणे आवश्यक आहे. ज्यावेळी लोक घरी राहतात त्यावेळी हे सत्र घ्यावे लागणार आहे. त्या गावातील लोकांच्या वेळे प्रमाणे सत्र लावून लसीकरण पूर्ण करून घ्यावे.

डेटा ऑनलाइन करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिल्यामुळे लसीकरण झालेल्याचे प्रमाण बरोबर आढळून येत नाही. त्यामुळे डेटा एन्ट्री वर मोठ्या प्रमाणावर भर द्यावा.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांनी थोडेसे माय बापा साठी, आमचा गाव आमचा विकास, जल जीवन मिशन, विद्युत देयके संदर्भात माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हा कार्यक्रम अत्यंत संवेदनेने राबविण्याचे निर्देश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.