‘ते’ ऐकून रात्री झोप येत नाही, आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोतीलाल राठोड या कवीचा आणि त्याच्या ‘पाथरवट’ या कवितेचा उल्लेख करत तशा कविता ऐकून रात्री झोप येत नसल्याचं मत व्यक्त केलं.

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोतीलाल राठोड या कवीचा आणि त्याच्या ‘पाथरवट’ या कवितेचा उल्लेख करत तशा कविता ऐकून रात्री झोप येत नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच हे ऐकून आपणच गुन्हेगार आहोत असंही वाटत असल्याचं नमूद केलं. ते त्यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी समाजकारण करताना या समाजाच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार याचा विचार करता येतो, असंही सांगितलं.

 

शरद पवार म्हणाले, “मी अनेकदा संध्याकाळी गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत घालवली आहे. त्याच्या मनात किती अस्वस्थता आहे, अन्याय-अत्याचाराबाबत ते काय विचार करतात हे यामुळे ऐकायला मिळते. आपण समाजकारण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार आहोत याचा विचार या निमित्ताने होतो.”

तरुणाला विचारलं हल्ली काय विचार करतो, तो म्हणाला तुमच्या विरुद्ध विचार करतोय”

“मी काल ऐकलेली कविता मला पूर्ण आठवत नाही. त्या कवीचं नाव मोतीलाल राठोड असावं. तो कवी बंजारा समाजाचा कार्यकर्ता आहे. ते पालं म्हणजे झोपड्यांमध्ये राहतात. मी त्याला सहज विचारलं हल्ली तू काय विचार करतोय? तो म्हटला मी तुमच्या सर्वांच्या विरुद्ध विचार करतोय. त्याने त्याची लहानशी कविता सांगितली. त्या कवितेचं नाव पाथरवट. पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन हातोड्याने मूर्तीचे दगड फोडणारे पाथरवट,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक, पण त्या मूर्तीचा बापजादा मी”
शरद पवार पुढे म्हणाले, “त्या कवितेत त्याने सांगितलं, हा मोठा दगड आम्ही घेतला, आमच्या घामाने, कष्टाने, हातातील छन्नीने आणि हातोड्याने त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर करतो. यानंतर सगळं गाव आलं आणि वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित केली. त्यापूर्वी माझ्याकडं कुणी ढुंकूनही पाहत नव्हतं. माझ्या घामाने मूर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे, पण तिचा बापजादा मी आहे. असं असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे. “

“…तेव्हा आपण स्वतः गुन्हेगार आहोत असं वाटतं”
“अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असं वाटतं. आपण काही केलं असो अथवा नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.