आष्टी नगरपंचायतक्षेत्रात ४५९ मतदारांची घुसखोरी!

निवडणूक आयुक्तांकडून मागविले मार्गदर्शन:

0
 • तालुक्यातील मतदारांची घुसखोरी, जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर

  आष्टी नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेकांनी मतदारयादीवर नोंदविलेल्या आक्षेपांनुसार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्‍यांसमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यात आष्टी नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांच्या मिळून मतदारयादीत तब्बल ४५९ नावे बोगस असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे.

  आष्टी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया पार पडली. त्यात प्रभाग रचना, मतदारयादी आदी मुद्द्यांवर आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यात मुख्यत्वे अनेकांनी मतदारयादीतील नावांवर आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपांवर तहसीलदार विनोद गड्डमवार व नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली.

  दरम्यान, नाजीम शेख व इतर चौघांनी मतदारयादीतील नावांवर आक्षेप घेत आसपासच्या गावांतील नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदारयादीत घुसडण्यात आल्याचे म्हणणे मांडले होते. ही नावे वगळावीत, या आक्षेपाच्या अनुषंगाने संबंधित मतदार व आक्षेपक यांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली.

  तसेच कार्यालयीन स्तरावर पथक नेमून संबंधित मतदारांच्या नवीन वास्तव्याच्या पत्त्यावर जाऊन पंचनामे केले असता संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात खात्री झाल्यावर ४५९ मतदारांच्या नावांसह तसा अहवाल सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे.


  निवडणूक आयुक्तांकडून मागविले मार्गदर्शन:

  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना आष्टीतील हा अहवाल पाठवला असून, ही ४५९ नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही करण्याबाबतचे मार्गदर्शन मागवले आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.