सीईओ रमल्या झेडपी शाळेच्या किलबिल मध्ये

एकाच गावातील दोन अंगणवाड्या च्या कारभारात तुलनात्मक फरक

0

नांदेड, रयतसाक्षी: मुलांनो दररोज न चुकता शाळेत या. अभ्यास करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला देत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज नांदेड तालुक्यातील नांदूसा येथील विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद केला. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट व सर्व विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

दीर्घ काळानंतर आज ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांची सुरुवात झाली. या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातील शाळा सज्ज झाल्या होत्या.

शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी नांदुसा येथील शाळेला भेट दिली. त्यांच्या समवेत प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर हे होते.

कोरोना काय आहे? हात स्वच्छ का धुवायचे? व्यायाम केल्याने काय होते? तुम्हाला कोण व्हायला आवडेल? असे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांना मोकळेपणाने आणि यथोचित उत्तरे दिली. कुणी गाणी म्हटली कुणी कविता, कोणी एखादा सुविचार सांगीतला. यावेळी विद्यार्थ्यांनी हे प्रभू हे समूह गीत सुरेल गायले.

इंग्रजीत संवाद केला. मुलांमध्ये धीटपणा आढळला. अशाप्रकारे सगळी शाळा आनंदमेळा झाली. लहान मुलांच्या चेहऱ्यावर आज कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता.

आजचे चित्र बघून मी खूश झाले. काय मागायचे असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केला. सरपंच प्रतिनिधी भास्कर जनुकवाडे, शिक्षक तसेच इयत्ता आठवीतील काही विद्यार्थींनीनी आम्हाला आठवीनंतर शिक्षणाची सोय करा. गावातच नववी आणि दहावीचा वर्ग उघडा, अशा पद्धतीची मागणी केली.

अंगणवाडीची झाडा झडती :

अंगणवाडी क्रमांक १ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी भेट दिली असता कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविकेला काहीही सांगता आले नाही. लाभार्थ्यांची संख्या देखील नीट सांगता येत नव्हती. साहित्याचे वाटप केल्याच्या नोंदी देता येत नव्हत्या.

हा प्रकार पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी संतापल्या.

अंगणवाडी क्रमांक २ मध्ये कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकेच्या उत्कृष्ट कामाबद्दल वंदना गवारे व ज्योती गोदरे यांचा त्यांनी सत्कार केला. तेव्हा अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीसाठी वीज कनेक्शन, एलईडी टीव्ही देण्याची मागणी केली. शाळांना मोफत वीज पुरवठ्याबाबत किंवा शाळांचे वीज देयक अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

अशी आहे शाळेची संख्या व पटसंख्या

ग्रामीण भागातील 3 हजार 115 शाळा आणि 2 लाख 5 हजार 20 विद्यार्थी तर शहरी भागातील इयत्ता 1 ते 7 च्या 334 शाळा आणि 86 हजार 48 विद्यार्थी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.