मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड

राज ठाकरे पुण्यात असतानाच घडला प्रकार

0

 

पुणे, रयतसाक्षी:मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. अशातच आज (१६ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही महिन्यांवर महानगर पालिकेच्या निवडणूका आल्या आहेत. याच रोशातून मोटारीची तोडफोड केल्याचं अनिता पांचाळ यांनी सांगितलं.

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ राहतात. त्या महानगर पालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा वावर त्या परिसरात वाढला आहे. रस्त्याच्या कडेला त्यांनी पार्क केलेली मोटार आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. वाहनाची तोडफोड करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या पदाधिकारी असलेल्या पांचाळ यांचं वाहन फोडण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

पिंपरीतही ६-७ वाहनांची टोळक्याकडून तोडफोड
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराळवाडी परिसरातही अज्ञात टोळक्याने ६-७ वाहनांची तोडफोड केली. यात सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असं असलं तरी मनसे पदाधिकाऱ्याच्या वाहनावरील हल्ला आणि ही तोडफोड यात थेट संबंध नसल्याची माहिती देण्यात आलीय.

या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत. अज्ञात ४ व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेत चारचाकी मोटारींना लक्ष करण्यात आलं आहे. अद्याप आरोपी मोकाट आहेत. पिंपरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.