संपकरी एसटी कर्मचा-यांना अजित पवार यांची विनंती

उद्या मेस्मा कायद्यांतर्गत काही निर्णय घेतला तर, माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले

0

 

रयतसाक्षी : एसटी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ देण्यात आली असून विलीनीकरणाच्या प्रश्नासाठी समिती नेमण्यात आली आहे. अशा वेळी लाखो प्रवाशांना वेठीस धरून काही एसटी कामगारांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून हा संप तात्काळ मागे न घेतल्यास मेस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) अंतर्गत कारवाई करावी लागेल, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे अनिल परब यांनी म्हटले आहे. एसची कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असे म्हटले आहे.

“शाळा, कॉलेज, परीक्षा सुरु झाल्या आहेत आणि अशावेळी सर्वसामान्यांना एसटीचा उपयोग होतो. एसटी कर्माचारी हट्टाला पेटले आहेत, हे बरोबर नाही. कर्मचारी आणि प्रवासीसुद्धा आपलेच आहेत. समजूदारपणे भूमिका घेतली पाहिजे. मी अनेकदा सांगितले आहे राज्यातला कुठलाही प्रश्न तो मांडणाऱ्यांनी दोन पावले पुढे मागे सरकले पाहिजे. ज्यांच्याकडे मागणी करण्यात येते त्यांनीही दोन पावले मागे सरकले पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारने स्वीकारली. अनिल परब सातत्याने त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. असे असून कर्मचारी मागे हटण्यासाठी तयार नाहीत. माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

अनिल परब यांनी आतापर्यंत अनेकदा मूभा दिली. पण आता मात्र त्यांनी सहनशीलता संपवण्याची वेळ आणली. आता सहनशीलतेचा अंत पाहू नये. एसटी कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे आता कामावर येऊन सुरुवात केली पाहिजे. एसटी चालवताना काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जाते. एसटीचे नुकसान झाले तर ते जनतेचच नुकसान आहे. त्यातून कोण काय मिळवतं?” असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

 

“उद्या मेस्मा कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नविन भरती सुरु केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये अशी माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे मानधन बऱ्यापैकी वाढवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना पगार कमी होता पण मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी. आपण महाराष्ट्रातील एका परिवारातील आहोत,” असे अजित पवार यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.