ग्रामिण भागातील झेडपीच्या शाळांना नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्राना येत्‍या डिसेंबर अखेर नळ जोडणीव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍याच्‍या सुचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी ठाकूर -घुगे

0

नांदेड,रयतसाक्षी : जल जीवन मिशन व स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत विविध विषयांचा आज जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आढावा बैठक घेण्‍यात आली. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे,

महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. पाटील, पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे प्रभारी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी एस.बी. गोरे, शिक्षणाधिकारी सवीता बिरगे, माध्‍यमिकचे शिक्षाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकारणचे कार्यकारी अभियंता एम.एस. बोडके यांची उपस्थिती होती.

जिल्‍हा परिषदेच्‍या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृहात ही आढावा बैठक घेण्‍यात आली. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्राना येत्‍या डिसेंबर अखेर नळ जोडणीव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍याच्‍या सुचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी दिल्‍या आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत राज्‍यात 90 दिवसाचा विशेष कार्यक्रम हाती घेण्‍यात आलेला आहे. त्‍यानुसार गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, विस्‍तार अधिकारी पंचायत व उप अभियंता यांनी एकत्रीत बैठक घेवून आपल्‍या तालुक्‍यात असणा-या शाळा व अंगणवाडयांना नळ जोडणी द्यावी. नळ जोडणी दिलेल्‍यांची माहिती संकेतस्‍थळावर ऑनलाईन करण्‍याच्‍या सूचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत सन 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील 40 लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनादेखील आता 55 लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत. अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाचे आराखडे तयार करुन तांत्रिक व प्रशासकिय मान्‍यता घेवून प्रत्‍यक्ष कामांना सुरवात करावी. सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण करावे. स्‍वच्‍छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 साठी गावस्‍तरावर नियोजन करावे.

सन 2020-21 व 2021-22 या दोन्‍ही वर्षातील एकत्रीतपणे संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियानातील जिल्‍हा परिषद गट निहाय उत्‍कृष्‍ट प्रभागाची तपासणी करुन निकाल जिल्‍हा परिषदेकडे सादर करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

या बैठकितला जिल्‍हयातील सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, विस्‍तार अधिकारी पंचायत, तालुका गट समन्‍वयक, समुह समन्‍वयक, जिल्‍हास्‍तरीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.