“भाजपाचे सगळे पोपट सतत टिवटिव करत असतात; ते सगळे…,” महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवसेना खासदाराचा संताप

“ज्वालामुखी बाहेर येऊ द्यायचा नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचा ताबडतोब राजीनामा घ्या”

0

रयतसाक्षी: बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन केलं जात आहे.

दादरमध्ये एकीकडे शिवसैनिकांची पोलिसांसोबत झटापट झाली तर दुसरीकडे लालबागमध्येही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं.

यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान गप्प का आहेत? अशी विचारणा केली.

लालबागमध्ये आंदोलनादरम्यान एबीपी माझाशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं फक्त स्वप्न दाखवलं नाही तर ते साकारही केलं.

त्या महाराजांचा अपमान भाजपाच्या सरकारमध्ये त्यांच्या आशीर्वादाने होत असेल तर देशाचे पंतप्रधान गप्प का? आमच्यात प्रचंड राग असून तो व्यक्त करत आहोत.

तो राग संयमी पद्धतीने व्यक्त करत आहोत त्याची दखल घ्या”.
“भाजपाचे सगळे पोपट सतत टिवटिव करत असतात, ते सगळे गप्प आहेत. यातूनच हे ढोंगी, निर्ढावलेली माणसं असल्याचं लक्षात येतं. ज्वालामुखी बाहेर येऊ देऊ नका.

तो बाहेर येऊ द्यायचा नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचा ताबडतोब राजीनामा घ्या,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

मुख्यमंत्री बोम्मई यांचे आक्षेपार्ह विधान
सीमा भागात संतापाचे वातावरण असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे आगीत तेल ओतले गेले. शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेची घटना क्षुल्लक आहे, असे विधान मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.