शिक्षण संचालकांनी दिले चौकशीचे आदेश… नांदेडचे शिक्षणाधिकारी कार्यालय लातूरच्या शिक्षण उपसंचालकांच्या रडारवर…

डिसेंबर २००५ मधील शिक्षणसेवक पदभरती संचिका गहाळ प्रकरण

0

नांदेड , रयतसाक्षी :डिसेंबर २००५ मध्ये  ४०७  शिक्षणसेवकांची पदभरती नांदेड जिल्हा परिषदेत करण्यात आली होती.या पदभरतीची संचिका अ दर्जाची असूनही, सदर संचिका एका वर्षापासून जि.प. मधील शिक्षण विभागास सापडत नाही.शिक्षणसेवक पदभरतीची संचिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी , ‘आस ‘ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण संचालकांकडे केली होती .

 

‘आस ‘ च्या निवेदनाद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर तात्काळ चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी.त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. असे आदेश शिक्षण संचालक दिनकर टेमकर – प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.तसेच या आदेशाची प्रत जि.प. नांदेडच्या  शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना कार्यवाहीस्तव तर ‘आस  ‘ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेस माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी याच  संचिका प्रकरणाची  चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त सुरेश बेदमुथा यांनी  नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आता शिक्षण संचालकांनीही या  प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याने  ‘संचिका गहाळ’ प्रकरण वरचेवर गंभीर  होत चालल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.

 

जिल्हा परिषदेतील शिक्षण  विभागाने सदर संचिकेच्या  संबंधित कर्मचाऱ्यांना तीन नोटीसा यापूर्वीच बजावलेल्या आहेत .या नोटीसीचा लेखी खुलासा बहुतांश संबंधित कर्मचाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे. या सर्वांच्या लेखी खुलाशांचे, वरिष्ठांकडून बारकाईने समजपूर्वक अवलोकन झाल्यास ; सदर  संचिकेचे धागेदोरे सापडण्याची शक्यता ‘आस ‘ शिक्षक संघटनेने वर्तवली आहे.  या प्रकरणी प्रशासनाद्वारे चालढकल व वेळकाढू धोरण अवलंबले जावू नये.अशी भावना संबंधित शिक्षकांद्वारे व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.