“ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा घातक, २०२२ मध्ये करोना….”

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं मत

0

रयतसाक्षी: करोना विषाणूपासून लवकरच सुटका होईल, अशी आशा वाटत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटची एंट्री झाली आणि जगभरात चिंतेचं वातावरण तयार झालंय. ओमायक्रॉनमुळे यावर्षी पण ख्रिसमस आणि नववर्ष भीतीच्या सावटाखाली साजरे करावे लागणार आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अभ्यास सुरू असल्याने हा वेगाने पसरतो आणि घातक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केलीये. तसेच लोकांनी करोना संदर्भातील खबरदारीचे उपाय घ्यावेत, असं म्हटलंय.

दरम्यान, आता जगभरातील सरकारांनी करोना या साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी काम केले पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस मंगळवारी म्हणाले की, “२०२२ या वर्षात आपण करोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात साथीच्या रोगाचा अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी,” असंही ते म्हणाले.
“गेल्या आठवड्यात, WHO ने नोव्हावॅक्सच्या परवान्याखाली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या नवव्या लसीसाठी आपत्कालीन वापर सूची जारी केली. ही नवीन लस COVAX पोर्टफोलिओचा भाग आहे आणि जागतिक स्तरावर लसीकरण लक्ष्य साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,” अशी आशा WHO प्रमुखांनी व्यक्त केली.

“जगभरात या वर्षी तब्बल ३३ लाख पेक्षा अधिक लोकांनी साथीच्या रोगामुळे आपले प्राण गमावले आहेत. २०२० मध्ये HIV, मलेरिया आणि क्षयरोगाच्या एकत्रित मृत्यूंपेक्षा जास्त मृत्यू एकट्या करोनामुळे झाले आहेत. दर आठवड्याला सुमारे ५० हजार लोकांनी जीव गमावला. तर, या महामारीच्या काळात अनेक मृत्यूंची नोंद झालेली नाही, त्यामुळे हा आकडा मोठा असू शकतो,” असं ते म्हणाले.

टेड्रोस म्हणाले, “ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा कैक पटीने जास्त प्रसार होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय आणि जे लोक करोनातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे,” असं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.