नागापूर येथे आज प्रशासन आपल्या गावी कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामस्‍थांना शासनाच्‍या विविध विभागातील योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

0

नांदेड, रयतसाक्षी: भोकर तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम अंतर्गत गावात लोकसहभागातून स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला असून गावात विविध विकास कामे केली जाणार आहेत. ग्रामस्‍थांना शासनाच्‍या विविध विभागातील योजनांची माहिती देण्यासाठी आज गुरुवार दिनांक २३ डिसेंबर रोजी प्रशासन आपल्या गावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे, गट विकास अधिकारी अमित राठोड आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमि अभिलेख, पुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण, ग्राम विकास, शिक्षण, महसूल, निवडणूक, विद्युत वितरण कंपनी, सहकार आदी विभागातील विविध विषयासंदर्भातील माहिाती ग्रामस्‍थांना देण्‍यात येणार आहे. यावेळी कोविड लसीकरण, आरोग्य तपासणी, जनावरांचे लसीकरण आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नागापूर ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.