नेपाळी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश

वसई पोलिसांची कामगिरी, १३ लाखांवर मुद्देमाल जप्त

0

मुंबई, रयतसाक्षी : घरफोडी करणाऱ्या नेपाळी गँगच्या मुसक्या आवळण्यात वसई पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वसईत घरफोडी केली. ते गुजरातमार्गे नेपाळच्या दिशेला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.

पण चोरांचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर चोर-पोलिसांच्या पकडापकडीचा भयानक थरार रंगला. पोलिसांनी चोरांचा सुरत ते गोध्रा असा ३५० किमीचा थरारक पाठलाग केला. त्यानंतर अखेर त्यांच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या नेपाळी गँगकडून १३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल मिळाला आहे. हा सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

नेमकं घडलं असं
मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे उपायुक्त संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. वसईतील भाबोला परिसरात एका घरातील सहा दरवाजांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील मुद्देमाल चोरी केला होता. संबंधित चोरीची घटना दि. ३० नोव्हेंबरला घडली होती.

त्यावेळी घरातील कुटुंब हे एका लग्नाच्या कार्यक्रमात गेले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरफोडी करत चोरी केली होती. या दरम्यान या चोरीची माहिती वसई पोलिसांना लागली. पोलिसांनी तातडीने चोरांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करुन तात्काळ चार पथके आरोपींना पकडण्यासाठी सुरत, पनवेल आणि वसई परिसरात रवाना केले होते. चोरी करुन आरोपी सुरतच्या दिशेने पळत असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सुरत ते गोध्रा असा ३५० किमी अंतरापर्यंत आरोपींचा पाठलाग केला. त्यांनंतर चोरांना गोध्रा येथून अटक केली.

लाखोंचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी नेपाळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपी सुरेंद्र अमृत बोगाटी, झापतसोप साबण, शेर बहादूर शाही यांना नेपाळला पळून जाण्यापूर्वी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १० ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ किलो चांदीचे दागिने, १० घड्याळे, एक लॅपटॉप, एक आयपॉड आणि एक लाख २४ रुपयांची असा एकूण १३ लाख ९३ हजार चा मुद्देमाल जप्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.