… तर शाळां वर कारवाई प्रस्तावित

टीसी नसल्याचे कारण दाखवून तो प्रवेश नाकारूनये आणि विद्यार्थ्याला वंचित ठेवू नये

0

नांदेड, रयतसाक्षी: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरूप कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार असून शाळांनी टीसी नसल्याचे कारण दाखवून तो प्रवेश नाकारूनये आणि विद्यार्थ्याला वंचित ठेवू नये तसे आढळल्यास संबंधित शाळांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

तसेच सर्व शाळा स्तरावर आर.टी.ई. नियमावलीचा बोर्ड लावावा असे नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज सांगीतले.

शिक्षण समितीची मासिक बैठक आज दुपारी त्यांच्या कक्षात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी सगळ्या सूचना दिल्या. बैठकीस ज्येष्ठ सदस्य साहेबराव धनगे, संध्याताई धोंडगे, अनुराधा पाटील, जोत्स्ना नरवाडे स्वीकृत सदस्य बसवराज पाटील, सदस्य संतोष देवराये यांची प्रमुख उपस्थिती होती.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. काही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत टीसीची मागणी करतात आणि ज्या शाळेमध्ये त्यांचा प्रवेश आहे त्या शाळा टीसी देत नाहीत अशा अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण समितीचे सदस्य साहेबराव धनगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सर्व सदस्यांनी या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशास अडचण येऊ नये असे सांगून ठरावास अनुमोदन दिले. सदस्य बसवराज पाटील आणि संतोष देवराये यांनी शिक्षकांच्या समस्या मांडल्या. चटोपाध्याय वेतनश्रेणी शिक्षकांची जीपीएफच्या पावत्या वेळेवर मिळणे आदी बाबत यांनी समितीसमोर निवेदन केले.

सभेचे प्रास्ताविक आणि आभार शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे यांनी मानले. बैठकीस माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, लेखाधिकारी योगेश परळीकर, सर्व गटशिक्षण अधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.