आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना चार लाखांची मदत, वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना लवकरच मदत : मंत्रीअजित पवार

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १०७६ शेतकरी आत्महत्या

0

रयतसाक्षी: शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशाला आणि राज्यालाही शोभणाऱ्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा एसडीआरएफमध्ये समावेश करून त्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदत करण्याची सरकारची योजना आहे, अशी घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

प्रश्नोत्तराच्या तासात शेतकऱ्यांच्या संदर्भात दोन प्रश्न उपस्थित झाले होते. त्याला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशीमध्ये कर्जमुक्ती हा उपाय होऊ शकत नाही, असे नमूद करण्यात आलेले आहे. राज्यात जून ते आॅक्टोबर २०२१ दरम्यान १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ४९१ प्रकरणे पात्र, तर २१३ प्रकरणे अपात्र ठरवली. ३७२ प्रकरणे प्रलंबित आहेत आणि ४८२ प्रकरणी मदतीचे वाटप झाले आहे.

शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली तर पात्र ठरवले जाते. इतर कारणे असतील तर अपात्र ठरवली जातात. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. पण ही रक्कम अपुरी आहे. त्यामुळे चार लाख रुपये मदत देण्याची योजना असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना लवकरच मदत : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, २ लाख रुपयांच्या वर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या‌ कर्जाची परतफेड केल्यास त्यांना २ लाख रुपयांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

कोरोना आणि पुढे लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली. या योजनेंतर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २०,२९० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.