आमदार रोहित पवारांची लवकरच मंत्रीमंडळात वर्णी?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे.

0

 

कर्जत-जामखेड , रयतसाक्षी : राज्यातील भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार झाले. त्यांनी निवडून येताच राज्य सरकारकडून मतदार संघासाठी मोठा निधी आणला आहे.

राज्य मंत्रिमंडळात आमदार रोहित पवार यांचा समावेश होणार या बातमीने समाज माध्यमावर धूम सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी या बाबत चुप्पी साधून आहेत?

या बाबत वृत्त असे की राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा भरली जाणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो व त्यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना स्थान मिळू शकते. अशी जोरदार चर्चा सुरू आहे.तसेच त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते अशी माहिती विश्वासनिय सूत्रांनी दिली आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे श्री वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडं दिली जाण्याची शक्यता आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं कारण देत नगरचे विद्यमान पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या वर असलेले प्रेम आणि लक्ष हे सर्वश्रुत आहे.त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत प्राधान्यदेत प्रचाराची सांगता सभा त्यांनी भरपावसात कर्जत येथे घेतली होती. तसेच भरभरून कौतुक करीत आशीर्वाद देत हा मतदारसंघ विकासाचे मॉडेल होत लोक तो बघायला येतील अशी भविष्यवाणी केली होती त्यास पूरक वातावरण सध्या दिसत आहे.

शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून रोहित पवार यांच्याकडं पाहिलं जातंय. तरुण चेहरा, आमदार झाल्यानंतर विकासाच्या कमी कालावधीत साधलेला कर्जत जामखेड चा विकास,राज्यात मिळत असलेली युवा वर्गातील प्रसिद्धी व त्यातून निर्माण झालेली क्रेझ आदी मुद्दे रोहित पवार यांच्या जमेच्या बाजू आहेत.

आमदार रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास कर्जत नगरपंचायत, जामखेड नगरपरिषद तसेच उंबरठ्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती,जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळू शकते असा राजकीय धुरिणांचा कयास आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.