हिवाळी अधिवेशन:विधानसभा अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी

पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर, नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

0

रयतसाक्षी: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रविवारी भेट घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून (सोमवारी) सांगतो, असे आश्वासन राज्यपालांनी या शिष्टमंडळाला दिले. राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी आता माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी भोरचे आमदार संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर यांची नावे चर्चेत होती, ती आता मागे पडली आहेत.राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे, तर २८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

त्याची माहिती देण्यासाठी रविवारी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर आले होते. या तिन्ही नेत्यांनी या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांना सरकारचा प्रस्तावही सादर केला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना राजभवनाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. भाजपने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नियम बदलास विरोध केला होता.

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली सोनिया गांधींची भेट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. चव्हाण यांनी सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील ‘१० जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे.हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी समंजस भूमिका घेतली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांनी सरकारला स्मरणपत्र पाठवले होते. त्यामुळे राज्यपालांकडून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला आडकाठी आणली जाणार नाही, असे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.