एसटी संपामुळे राज्य सरकारचे ६५० कोटींचे नुकसान

कृती समितीचा अहवाल आल्यानंतरच विलिनीकरणाचा निर्णय- परब

0

रयतसाक्षी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची असून, या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला बारा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले.

पुढे परब म्हणाले की, संपापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते, तरी देखील संप सुरुच राहिला. यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा लावून धरण्यात आला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमलेली ही समिती कामगार, युनियनसह सर्व बाजू ऐकून घेऊन शासनाला अहवाल सादर करणार आहे.

राज्य शासनाने मागणीप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली. देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढे वेतन आता एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हा पगार दर महिन्याच्या दहा तारखेला खात्यात जमा केला जाणार आहे. याची हमी देखील राज्य शासनाने घेतली आहे. अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संपामुळे सामान्य जनता वेठीस धरली गेली आहे. कामावर येण्याचे आवाहन केल्यानंतर देखील कर्मचारी कामावर परतत नाहीत. एवढेच नाही तर त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर देखील कामावर परतत नाहीत. त्यामुळे जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही त्यासाठी वेगळी प्रक्रिया लागेल. असेही परब यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.