राष्ट्रवादीच्या ॲड. रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला

कारवर सशस्त्र हल्ला; मानेगाव कोथळीदरम्यानच्या अंतरंगातील घटना, हल्लेखोर पसार

0

रयतसाक्षी: जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला करून पलायन केले. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास चांगदेवकडून कोथळीकडे येताना सूतगिरणीजवळ ही घटना घडली. हल्ला करणारे पाच जण दुचाकीवर होते, असे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष उफाळून आला आहे. त्यातून समर्थकांचे परस्परांविरुद्ध गुन्हे, दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. दुसरीकडे सोमवारी रात्रीच चांगदेव येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळीकडे येताना अॅड.रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केला. खडसे रात्री सव्वानऊच्या सुमारास मानेगाव व कोथळी दरम्यान सूतगिरणीजवळ असताना एमएच१९-सीसी १९१९ क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञातांनी कोयत्याचा वापर करून हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक पांडुरंग नाफडे आणि गाडी चालक होता. सुदैवाने हल्ल्यात खडसे यांना काहीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर हल्लेखोर काही क्षणात पसार झाले.

उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली : एकनाथ खडसे
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सूतगिरणीच्या पुढे एक किमी अंतरावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात तलवार, लोखंडी राॅड व पिस्तूल होते असे चालकाने सांगितले. वाहनाच्या काचेवर हल्ला होताच जीव वाचवण्यासाठी त्या शेतात पळाल्या. ही गंभीर परिस्थिती आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती कळवली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.