शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, सोमवारीच अधिवेशनात लावली होती हजेरी

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारीच विधिमंडळात हजेरीचा हा फोटो ट्विट केला होता. i

0

 

रयतसाक्षी: राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल अधिवेशनात वर्षा गायकवाड यांनी आपली उपस्थिती लावली होती. अनेक मंत्री त्यांच्या संपर्कात आल्याचे देखील कळते आहे. त्यामुळे अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

काल विधान परिषदेत वर्षा गायकवाड यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शिक्षण विभागासंबंधी भाष्य देखील केले होते. त्यावेळी सभागृहाच्या जवळपास सर्वच आमदारांच्या संपर्कात गायकवाड आल्याचे कळते. यापुर्वी देखील हिवाळी अधिवेशनात सुमारे 36 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोना लागण झाली होती.

रोज कोरोना टेस्ट

हिवाळी अधिवेशनादरम्यान आतापर्यंत सुमारे 36 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर आता आजपासून रोज कोरोना चाचणी केली जाईल. असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, “गर्दी वाढली आहे. ख्रिसमस न्यू-ईयर असताना लोक काळजी जास्त घेत नाहीत. प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावे लागणार आहे. वातावरण भीतीचे आहे. शाळा कॉलेज संदर्भातील निर्णय पुढील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळांसंदर्भात हा आठवडा झाल्यावर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, सध्या आम्ही परिस्थिती पाहतोय.” तसेच पुढे बोलताना विधिमंडळ परिसरात प्रवेश करताना सोमवारपासून डेली टेस्ट करावी लागणार आहे, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.