ओमायक्रॉनचा भयावह वेग:देशात एका दिवसात सर्वात जास्त १३५ रुग्ण सापडले

२५ दिवसांपूर्वी केवळ २ रुग्ण होते आता ६८७ झाले

0

रयतसाक्षी: देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने भयावह वेग पकडला आहे. सोमवारी एका दिवसात सर्वात जास्त १३५ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून ६८७ झाली. सोमवारी गोवा आणि मणिपुरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला. ओमायक्रॉन आतापर्यंत २१ राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.

गोव्यात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
गोव्यात ब्रिटनमधून परतलेल्या ८ वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, हा मुलगा १७ डिसेंबर रोजी ब्रिटनहून गोव्याला रवाना झाला होता. त्याचवेळी, मणिपूरमध्ये एका 48 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी टांझानियाहून इंफाळला परतली आहे.

दिल्लीत एका दिवसात ओमायक्रॉनचे विक्रमी ६३ प्रकरणे
सोमवारी दिल्लीत विक्रमी ६३ नवीन प्रकरणे आढळून आली, जी देशातील कोणत्याही राज्यात एका दिवसात सापडलेल्या नवीन ओमायक्रॉन रुग्णांची सर्वात मोठी संख्या आहे. राष्ट्रीय राजधानीत एकूण ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या आता १६५ झाली आहे.

ओमायक्रॉनने सर्वात प्रभावित राज्य महाराष्ट्र
ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. सोमवारी येथे २६ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनने सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये गुजरात ७३ प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर केरळ ५७ प्रकरणांसह चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय सोमवारी गुजरातमध्ये २४, तेलंगणामध्ये १२, राजस्थानमध्ये ३, उत्तराखंडमध्ये ३ आणि हरियाणामध्ये २ नवीन रुग्ण आढळले आहेत.

नागपुरात तिसऱ्या रुग्णाची नोंद
राज्यात ओमायक्रॉन हा विषाणू वेगाने पसरताना दिसत आहे. नागपुरमध्ये आज तिसऱ्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंतेत आणखीणच भर पडली आहे. आज आढळलेल्या महिला रुग्णासोबत तिचा पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या दोघांवर नागपुरातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील ओमायक्रॉन बाधित महिलेच्या पत्नीचा देखील अहवाल जणुकीय चाचणीसाठी पाठवण्यात आला असून, त्याच्या रिपोर्टची सध्या प्रतिक्षा आहे.

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण २ डिसेंबर रोजी कर्नाटकात आढळला
देशातील ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण २ डिसेंबर रोजी कर्नाटकात आढळून आले. येथे दोन परदेशी नागरिकांना ओमायक्रॉन लागण झाल्याचे आढळून आले. कर्नाटकानंतर ओमायक्रॉनने गुजरातमध्ये शिरकाव केला. आफ्रिकन देश झिम्बाब्वे येथून जामनगरला परतलेल्या गुजरात वंशाचा व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली. गुजरात नंतर, ओमायक्रॉन महाराष्ट्रात पोहोचला आणि २५ दिवसात २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशात शिरकाव केला.

देशात ओमायक्रॉन संसर्गाचा झपाट्याने फैलाव पाहता आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभे आहोत, असे बोलले जात आहे. खरं तर, आरोग्य तज्ञ म्हणतात की बहुतेक ओमायक्रॉन संक्रमित व्यक्तींमध्ये लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. अशा स्थितीत ओमिक्रॉनची अनेक प्रकरणे अद्याप पकडली गेली नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्राने कोरोनाशी संबंधित निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत वाढवले ​​आहेत
ओमायक्रॉनचा धोका पाहता केंद्र आणि राज्य सरकारे सतर्क झाली आहेत. केंद्राने कोरोनाशी संबंधित निर्बंध ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवले ​​आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही, याची खात्री राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केली जाईल. यामध्ये स्थानिक आणि जिल्हा प्रशासनालाही गरज भासल्यास कंटेनमेंटसंबंधीत पावले उचलण्यासही सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू
नवीन वर्षापूर्वी राज्य सरकारेही नागरिकांची वर्दळ आणि गर्दीवर निर्बंध घालण्याबाबत पावले उचलत आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी रात्री कर्फ्यू लागू केला आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.