चिंता वाढली: महाराष्ट्र तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर!

राज्याची कॅबीनेट‌घेणार आज आढावा , कठोर निर्बंध लागण्याची शक्यता

0

रयतसाक्षी: राज्यावर ओमायक्रॉनचे मोठे संकट असून सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना ते घराबाहेर न करता घरीच साधेपणाने साजरे करा, अशी सूचना राज्याच्या गृह विभागाने बुधवारी नागरिकांना केली. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मिरवणुका काढू नयेत, फटाक्यांची आतषबाजीही करू नये, असेही निर्देश आहेत. २५ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू आहे. खुल्या जागेवरील कार्यक्रम २५%, तर बंदिस्त जागेवरील कार्यक्रम ५०% क्षमतेत घेण्याचे निर्बंध आहेत. तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात दैनंदिन ५० हजारांहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी आपण करत आहोत. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर २ टक्के आहे, तर मुंबईतील ४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रुग्ण दुपटीचा काळ तीन दिवसांवर आला आहे. प्रशासनाची चिंता वाढली असून गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना राज्य कृती दलाशी चर्चा करणार असून नव्याने आणखी काही निर्बंध लावण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे म्हणाले, “मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या २००० च्या पुढे जाऊ शकते. पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्के येऊ शकतो. हे अजिबात चांगले नाही. काळजी घेतली नाही तर किंमत चुकवावी लागेल. निर्बंध आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे.’

टास्क फोर्सचा इशारा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दीड महिना चिंतेचा

विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य सरकारसमोर केलेल्या सादरीकरणात २० जानेवारीनंतर राज्यात रुग्णसंख्येचा विस्फोट होईल असा अंदाज मांडला होता. गुरुवारी (ता. ३०) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यात आरोग्य विभाग राज्यातील कोरोना परिस्थितीचे सादरीकरण करणार आहे. त्यानंतर सरकार राज्यात कडक निर्बंध लावणार असल्याचे संकेत आहेत. 1 डिसेंबरला होते 767 नवे रुग्ण, 29 ला वाढले 3,900

राज्यातील नव्या कोरोना रुग्णांत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. २९ डिसेंबरला ३,९०० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. १ डिसेंबर २०२१ ला राज्यात ७६७ नवीन रुग्ण आढळले होते. अवघ्या २९ दिवसांत २८,९६१ नवे रुग्ण (५०८.४७%) वाढले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १४,०६५ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्या ६६ लाख ६५,३८६ तर ६५ लाख ६,१३७ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण मृतांची संख्या १ लाख ४१,४९६ इतकी तर मृत्युदर २.१२% आहे.

 

ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण
बुधवारी ८५ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. ३८ रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. एकूण बाधितांचा आकडा २५२ वर गेला आहे. यापैकी ९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

मुंबईत पुन्हा उद्रेक; २,५१० नवे रुग्ण
मुंबईत बुधवारी दिवसभरात २,५१० कोरोना रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली. मुंबईत २० डिसेंबरला २०० रुग्ण होते. आठ दिवसांत १४०० रुग्ण झाले. ते आता ४ हजारांवर गेले आहेत.

 

राज्यात महिनाभरात 508%नवीन रुग्ण वाढले, टास्क फोर्स सदस्यांचे मत
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात येऊ शकते, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. त्यावर टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, मुंबईत तिसरी लाट आली आहे, असे म्हणायला आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.

डॉ. राहुल पंडित म्हणाले, दोन ते तीन दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. ते पाहता ओमायक्रॉन विषाणूचा हा प्रादुर्भाव सध्या असावा. डेल्टा व्हेरिएंटमध्ये रुग्णवाढ एवढ्या वेगाने होत नव्हती. फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट शिखरावर असेल. पुढील दीड महिना चिंतेचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.