अहमदनगरच्या शासकिय रूग्नालयातील आयसीयूची होरपळ सुरूच !

अतिगंभीर रूग्नांना धरावी लागते खासगी रुग्णालयाची वाट

0

अहमदनगर ,रयतसाक्षी: सव्वीस दिवस उलटले. चौदा रुग्णांचा बळी घेणाऱ्या आयसीयूच्या दारावरील कुलूप बंद आहे आणि चावी पोलिसांच्या ताब्यात. अग्निरोधक यंत्रणेशिवाय दुरुस्ती नाही आणि निधीशिवाय अग्निरोधक यंत्रणा नाही अशा कोंबडी आधी की अंडी या वादात शासकीय यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे .

आगीच्या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांचा प्रभारी भार आणि चौकशी समितीचा अहवाल फाइलबंद…. या परिस्थितीत होरपळलेल्या अ‌वस्थेत आयसीयू आणि खासगी रुग्णालयासाठी पळापळ करणारे अति गंभीर रुग्णांचे नातलग. हे चित्र आहे दुसरी लाटही न ओसरलेल्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला आग लागली होती. त्यातील बळींची संख्या १४ वर गेली.

उच्च स्तरावर सुरू झालेली चौकशी शासकीय “कासव’गतीने सुरू आहे आणि अतिदक्षता विभागच बंद असल्यामुळे या रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

समन्वयाचा आभाव
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर अतिदक्षता विभाग पोलिसांकडून सील करण्यात आले आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर आली असतानाही अजूनही हा अतिदक्षता विभाग सील आहे.

सील असलेल्या अतिदक्षता विभागाची चावी ही पोलिस प्रशासनाच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून हा कक्ष अजून जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. पोलिस प्रशासनाने हा कक्ष हस्तांतरित केल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग अतिदक्षता विभागाची दुरुस्ती करणार आहे. दुरुस्तीबाबत केवळ प्रशासनाची टोलवाटोलवी चालू आहे.

जबाबदारीचे भिजत घोंगडे
आगीनंतर अतिदक्षता विभागाची चावी ही पोलिस प्रशासनाकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा शासकीय रुग्णालयात फायर फायटर (अग्निशामक यंत्रणा) बसवल्या शिवाय दुरुस्तीची पुढची प्रक्रिया करता येणार नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या टोलवाटोलवीमुळे अतिदक्षता विभाग दुरुस्त होण्यासाठी विलंब लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यात लक्ष घातले असले तरी केवळ कागदोपत्री घोडे नाचविण्यात प्रशासन व्यग्र आहे.

तरीही कारभार प्रभारींच्या खांद्यावरच!
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषण कुमार रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांवर निलंबनाची कारवाई व चार परिचारिकांना अटक यामुळे सध्या शासकीय रुग्णालयाचा कारभार राम भरोसे सुरू आहे. प्रभारी म्हणून रामटेके यांना पुरेसे अधिकार नसल्याने नवीन अतिदक्षता विभाग दुरुस्त करणार कोण, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.